विश्व हिंदू परिषदेच्या वतीने वारकऱ्यांसाठी रुग्णवाहिकेमधून पुणे ते पंढरपूर मोफत आरोग्यसेवा
गेल्या 37 वर्षांप्रमाणे याही वर्षी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पुणे ते पंढरपूरपर्यंत मोफत आरोग्यसेवा आणि औषधोपचाराचा उपक्रम राबविला जाणार आहे. अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री प्रा. संजय मुद्राळे आणि सहमंत्री ॲड. सतीश गोरडे यांनी दिली. ह्या आरोग्य सेवेचा प्रारंभ पुण्यातून करण्यात आला असून या पथकामध्ये एकूण 10 रुग्णवाहिका, 28 डॉक्टर्स, 24 परिचारिका आणि 80 कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
आज पुण्यातून संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी मार्गावर 3, संत तुकाराममहाराज पालखी मार्गावर 3 आणि डॉक्टरांची ने-आण करण्यासाठी 1असे रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यात आले आहे. संत निवृत्तीनाथ पालखी मार्गावर आठ दिवसांपूर्वीच 3 रुग्णवाहिका देऊन आरोग्यसेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका अन्न आणि औषध प्रशासन अतिरिक्त आयुक्त श्याम पवार यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्यपथकात सहभागी झालेल्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि कार्यकर्ते यांना शुभेच्छा देताना श्याम पवार यांनी, “हा सेवा प्रकल्प वारकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून सहभागी डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी, तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन रुग्णांवर औषधोपचार करताना शासन आणि आरोग्य संघटनेने ठरविलेल्या नियमांचे पालन करावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली.
हे सामाजिक आणि धार्मिक कार्य करण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका आणि कार्यकर्ते काम करीत आहेत. यावेळी प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, किशोर चव्हाण, मनोहर ओक, धनंजय गायकवाड, विजय कांबळे, राजेश कोंढरे यांच्या उपस्थितीत आरोग्य पथकाचा सत्कार करण्यात आला.विश्व हिंदू परिषद हे कार्य गेली 37 वर्षांपासून करीत आहे.