आकाशवाणी पुणे केंद्र – प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय.
केंद्रीय नभोवाणी मंत्रालयाच्या प्रसार भारतीने आकाशवाणी पुणे केंद्र – प्रादेशिक वृत्त विभाग, बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचा लेखी आदेश देखील जारी करण्यात आला आहे.
त्यानुसार 19 जूनपासून पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणी वरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र छ संभाजी नगर वृत्त विभागाकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या विभागाद्वारे प्रसारित केली जाणारी विविध भारतीवरील ठळक बातमीपत्रे, पुणे वृत्तांत हे विशेष बातमीपत्र आणि वृत्ताधारित कार्यक्रम देखील आता बंद होणार आहेत.या निर्णयामागे कारण देताना प्रसार भारतीने या विभागांचे प्रमुख म्हणून काम करण्यासाठी भारतीय माहिती सेवेतील पूर्णवेळ अधिकारी दीर्घकाळापासून उपलब्ध नसल्याने पुणे वृत्त विभागाची बातमीपत्रे छ. संभाजी नगर कडे सोपवण्यात येत असल्याचे यासंबंधीच्या आदेशात म्हटले आहे.
लोकशाहीचा ४ था स्तंभ समजल्या जाणाऱ्या ‘सरकारी प्रसार माध्यमांची’ हत्या या शब्दात काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी निषेध केला आहे.
प्रसिध्दी पत्रकात ते पुढे म्हणाले कोरोना काळामध्ये पुणे वृत्त विभागाने अल्पावधीत आदेश मिळाल्यानंतर तीन मराठी राष्ट्रीय बातमीपत्रे तातडीने पुणे केंद्रावरुन प्रसारित करण्यास सुरुवात केली होती तसेच आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टिने देखील या विभागाची बातमीपत्रे महत्वाची ठरणार आहेत.
दिल्ली मुख्यालयाने विविध प्रसंगांच्या अनुषंगाने अतिरिक्त कार्यभार सोपवल्यास तो देखील सांभाळण्यास हा विभाग सक्षम आहे. असे असताना केवळ पूर्णवेळ भारतीय माहिती सेवेचा अधिकारी उपलब्ध नाही म्हणून पुण्यासारख्या महत्वाच्या केंद्रावरील प्रादेशिक वृत्त विभागच बंद करणे हे समर्थनीय नाही.पुणे शहर ऐतिहासीक, सामाजिक क्रांतीकारकांचे शहर असून, राज्याची सांस्कृतीक राजधानी व विद्येचे माहेरघर समजले जाते त्यामुळे हा पुणेकरांचा अवमान देखील आहे.