पथारी, हातगाडी विक्रेत्यांच्या भोंग्याबाबत धोरण आखण्याची माजी नगरसेविका मीनल यादव यांची मागणी
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देवून पिंपरी-चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी विक्रेत्यांच्या टपऱ्यावरील भोंग्याबाबत धोरण आखण्याची मागणी माजी नगरसेविका मीनल यादव यांनी महापालिकेकडे केली आहे.
निवेदनात यादव यांनी म्हटले आहे की,शहरांमध्ये अनेक ठिकाणी फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते भोंगे घेऊन रहिवासी गल्लीबोळामध्ये आपला माल विकण्यासाठी भोंग्यांवरती मोठ्या मोठ्याने ओरडत माल विकण्याचा प्रयत्न करत असतात.
हे विक्रेते कोणत्याही वेळेची तमा न बाळगता कोणत्याही वेळेस (पहाटे सकाळी, दुपारी रात्री) येऊन ओरडत असतात. यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना, हॉस्पिटल मधील रुग्णांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो. यावरती कोणाचाही व कोणतेही नियंत्रण नाही.
या भोंग्यांची वेळ ठरवणे, आवाजाचा डेसिबल ठरवून देणे, रुग्णालय, शाळा, रहिवासी भागामध्ये त्यास बंदी करणे आवश्यक आहे. या सर्वांचा विचार करून महापालिकेने धोरण ठरवावे. त्याची लवकरात-लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी यादव यांनी निवेदनातून केली आहे.