सातारा स्पोर्टस् ऐप माध्यमाद्वारे खेळाडूंच्या संपर्कात राहण्याचा वेगळा प्रयत्न.
आपल्याकडे खेळाडूंना सुविधा मिळत नाहीत, किंवा सरकार खेळाडूं पर्यंत पोहचू शकत नाही,अशी तक्रार नेहमीच होते. अधिकाधिक खेळाडूंपर्यंत पोहोचता यावे यासाठी सातारच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथमच स्वतःचे सातारा स्पोर्टस् ऐप तयार केले आहे. त्या माध्यमाद्वारे खेळाडूंच्या संपर्कात राहण्याचा वेगळा प्रयत्न केला जात आहे. इतर कार्यालयाप्रमाणे सातारा जिल्हा क्रीडा कार्यालयही हायटेक झाले आहे.
क्रीडाविषयक परिपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी या ॲपमध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांची नावे व त्यांचे संपर्क नंबर देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या खेळाच्या स्पर्धा कधी, कुठे, केव्हा होणार याचा तपशील(कॅटलॉग)
ही दिला आहे. खेळांच्या स्पर्धांचे वर्षभराचे वेळापत्रक देण्यात आले असून फोटो गॅलरीमध्ये सातारा जिल्हा क्रीडा कार्यालय, तालुका क्रीडा कार्यालये, शहरात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांचे फोटो आहेत. खेळाडूंना आवश्यक असणारे सर्व मेल आयडी या विभागात आहेत. तसेच जिल्हा, तालुका क्रीडा अधिकारी यांचे पत्ते, फोन नंबर, मेल आयडी देण्यात आले आहेत.
या ऐपच्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या मोबाईलवर स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करता येणार असून सरकारच्या क्रीडा विषयक नव्या घोषणाही पाहता येणार आहेत.
यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना सातारला येण्याची गरज भासू नये, हादेखील या ऐप मागचा उद्देश आहे. खेळांची माहिती, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू माहिती,शासन निर्णया बाबत माहिती अवगत करून देण्यात येणार आहे.
या ऐपच्या माध्यमातून खेळाडूंना हवी ती माहिती मिळणार आहे. तसेच विविध प्रकारच्या स्पर्धांची नावनोंदणी करता येणार आहे. या अॅपमध्ये सातारा जिल्हा विषयी माहिती देण्यात आली असून सरकारतर्फे खेळासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकार व भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या पुरस्काराप्राप्त पुरस्कारार्थींची नावेही यात घेण्यात आली आहेत.