विठुरायाच्या दर्शना साठी निघालेल्या भाविकांच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू, नऊजण गंभीर जखमी
चिखली, पिंपरी चिंचवड येथून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा भिगवण जवळ अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला. तर नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.भिगवण येथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या एका टेम्पोला त्यांच्या कारची जोरात धडक बसली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास जालिंदर विरकर, त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी कारमधून जात होते. रस्त्यात थांबलेल्या टेम्पोमुळे कार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. यामध्ये जालिंदर यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबातील पाचजण आणि नात्यातील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.टेम्पो चालक महेश गिरी (वय 32, रा. उस्मानाबाद) याच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार मधील जालिंदर बाळासाहेब विरकर (वय 36, रा. चिखली) असे मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे. त्याचप्रमाणे जालिंदर यांची पत्नी प्रीतम विरकर, मुलगी स्वरा विरकर, आई लक्ष्मीबाई विरकर, भाऊ मच्छिंद्र विरकर, राजू फडके, त्यांच्या पत्नी वैशाली फडके, मंगल मेदनकर, विशाल मोरे आणि संगिता मोरे अशी जखमींची नावे आहेत.