महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत – आयुक्त शेखर सिंह यांची विशेष उपस्थिती.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज अजंठा नगर येथील माता रमाबाई भीमराव आंबेडकर प्राथमिक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले तसेच त्यांच्याशी संवाद देखील साधला.
“भारत माता की जय” असा जयघोष करत ढोल ताशांचा गजर, लेझीमचा ताल या उत्साही वातावरणात शाळेची घंटा वाजली. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने नवी उमेद आणि आशा घेऊन महापालिका शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांसह मोठ्या हर्षोल्हासात स्वागत झाले.महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, दप्तर, बुट अशा विविध शालेय वस्तू शाळेच्या पहिल्याच दिवशी उपलब्ध होतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. त्यानुसार महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अशा वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. बालवाडीपासून या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
महापालिकेच्या इतर शाळांमध्ये देखील पालक, शिक्षक आणि महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा परिसर तसेच वर्गखोल्या सजवण्यात आल्या होत्या.
नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस शासनाच्या निर्देशानुसार शाळा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागता सोबतच त्यांना पुस्तके देखील देण्यात आली.
आयुक्त शेखर सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रतिसाद देताना शाळेचा पहिला दिवस छान वाटतो अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. पालकांचा आपल्या पाल्याप्रती तसेच शाळेप्रती सकारात्मक दृष्टीकोन राहिल्यास शिक्षकांनादेखील प्रेरणा मिळत असते. यामधूनच शाळा उज्ज्वल कामगिरी करू
शकते असा विश्वास आयुक्त सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. या यशामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्वपुर्ण असते. आपली शाळा प्रथम क्रमांकावर यावी यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी मेहनत आणि प्रयत्न केले पाहिजेत, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
महानगरपालिकांच्या शाळांमध्ये मोफत व दर्जेदार शिक्षण दिले जाते. महापालिकेच्या शाळांमध्ये ई – क्लास उपक्रमांतर्गत प्रत्येक वर्गात स्मार्ट टी. व्ही. संगणक आणि गणित कक्ष यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण आणि शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर शक्य झाला आहे.
यावर्षी महापालिका शाळांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी शाळांमध्ये केली जाणार आहे. ३२ शाळांमध्ये कला आणि क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येकी ५ शाळांमागे एक समुपदेशकाची नेमणूक करण्यात आली आहे. आकांक्षा फाऊंडेशन सोबत संलग्न होऊन सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जात असून गुणवत्तावाढीवर भर दिला जात आहे. त्यामुळे महापालिका शाळांच्या गुणवत्तेत निश्चितपणे भर पडणार आहे.
शालेय साहित्यापोटी पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ३५०० रुपये तर पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ३७०० रुपये यावर्षीपासून डीबीटीद्वारे पालकांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. दर्जेदार साहित्याचा बाजारभाव बघून ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे. पालकांनी या रकमेतून आपल्या पाल्यांना शालेय साहित्य घेऊन द्यावे. या योजनेला यशस्वी करण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. महापालिका शाळांच्या पटसंख्येत वाढ होऊन याठिकाणी प्रवेश घेण्यासाठी इच्छा निर्माण व्हावी असे पालकांना वाटले पाहिजे, असे काम महापालिका शिक्षकांनी करावे अशी सुचनाही आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
शाळेच्या पहिल्या दिवशी झालेल्या स्वागतामुळे भारावून गेलो आहोत. शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश आणि पुस्तके हातात पडल्यामुळे आम्ही आनंदी आहोत, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.