पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या भूसंपादनामुळे बाधित झालेल्या भूमिपूत्रांचा प्रश्न सोडविण्यात येईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शुक्रवारी पिंपरी चिंचवड येथील थेरगावात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले की, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या भूसंपादनामुळे बाधित झालेल्या भूमिपूत्रांचा प्रश्न सोडविण्यात येईल,२०१८ ते २०२३ पर्यंतचे विकास आणि बांधकामाचे अतिरिक्त विकास शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय. एप्रिल २०२३ पासून क्षेत्रनिहाय तपासून आकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीतील अनधिकृत बांधकामासाठीचा ४६० कोटी रुपयांचा शास्तीकर माफ करण्यात आला आहे.
थेरगाव शिबिरात विविध योजनांची माहिती
या कार्यक्रमासाठी थेरगाव येथील पदमजी पेपर मिलजवळ भव्य मंडपात विविध कक्ष तयार करण्यात आले होते. नागरिकांना याठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यात आली. उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रहिवासी दाखला, सातबारा, आठ अ, हवेली तालुक्यातील रहिवाशांकरिता जातीचा दाखला, वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला, ३३ टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला देण्याची सुविधा करण्यात आली होती.कार्डमधील नवीन दुरूस्ती व अद्यावत करणे, मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करणे, शिधापित्रकेवरील नाव कमी करणे, रेशनकार्डवरील नाव वाढविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा दाखला, नॉन क्रिमीलिअर, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा दाखला देणे आदी सेवाही यावेळी देण्यात आल्या.
पुणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार गती
पालखी मार्ग आणि पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. चांदणी चौकातील कामही पूर्ण होत आहे. जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आणि वढू बुद्रुक येथे संभाजी महाराज स्मारक काम लवकरच सुरू करण्यात येईल.
यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी ५ कोटी रुपये देण्यात येतील. पुण्यातील नद्यांमधील पाणी निर्मळ राहावे यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जलशुद्धीकरणास निधी देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.