यशवंतराव चव्हाण यांच्या अद्यावत स्मारकासाठी पाच कोटींचा निधी मिळणार,मुख्यमंत्र्याची निधी देण्याची घोषणा
यशवंतराव चव्हाण स्मारक समिती मार्फत उद्योगनगरीतील निगडी प्राधिकरणातील 44 गुंठ्यावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे अद्यावत स्मारक करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. या स्मारकासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रभर राबविलेल्या औद्योगिक आणि सहकार धोरणामुळे पिंपरी-चिंचवड मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर उद्योगधंदे सुरू होऊन अल्पावधीतच महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक राज्य म्हणून नावरूपास आले.कुशल हातांना रोजगार मिळाला. छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यांना चालना मिळाली याच कार्याची स्फूर्ती भावी पिढीतील युवकांना मिळावी म्हणून हे अद्यावत स्मारक करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा, गोरगरीब मुलांसाठी वसतिगृह, विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र,वधु वर सुचक केंद्र,नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्र, सुसज्ज ग्रंथालय इत्यादी सुविधांसह आराखडा मंजूर करून चार मजल्या पर्यंतचे इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.या संपूर्ण इमारत बांधण्याचा खर्च अंदाजे 15 कोटी रुपये आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्मारका करिता पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. परंतु स्मारकाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. याकडे लक्ष्य वेधत पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
मुख्यमंत्र्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती व कार्याची माहिती भावी पिढीला व्हावी या शुद्ध हेतूने उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला पाच कोटी रुपये निधी देण्यात येईल असे सांगितले