पुणे नाशिक महामार्गावर धावत्या शिवशाही बसला आग..सर्व प्रवासी सुखरूप
पुणे नाशिक महामार्गावर चाकण (ता. खेड ) येथील तळेगाव चौकामध्ये नाशिक कडून पुणेकडे जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसने (क्रमांक ए के एच 09 ई एम 2607) (शनिवारी.दि. 17 जून) दुपारी बाराच्या सुमारास अचानक पेट घेतला .यावेळी बसमध्ये सुमारे 25 प्रवासी प्रवास करत होते .बसला आग लागल्याची बाब निदर्शनास येताच सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले.अवघ्या 15 मिनिटात चाकण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचा अग्निबंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत आग विझवण्यात आली . सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
महामार्गावरील घडलेल्या या घटनेमुळे रस्त्याच्या दुतर्फा खूप मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. चाकण वाहतूक शाखेने अवघ्या तासाभरात वाहतूक पूर्ववत केली.संबंधित बसच्या चाकांचे ड्रम लायनर गरम होऊन टायर ने पेट घेतल्याचे बसचे चालक दीपक निकाळे यांच्याकडून सांगण्यात आले.