पुण्यातल्या वारजे परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार, एक जखमी
पुण्यातल्या वारजे परिसरात दहशत माजवण्यासाठी विरोधी टोळीवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एक मुलाच्या पायाला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला आहे.
दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास वारजे परिसरातल्या रामनगर टाकी चौक ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सुरज तात्याबा लंगार (वय २१, रा. वारजे माळवाडी) असं जखमी झालेल्याचं नाव आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याचं सांगण्यात येत आहे. वारजे परिसरातल्या रामनगर टाकी चौक येथे पाच मुलांची टोळी आपापसात गप्पा मारत होती. त्या ठिकाणी गाडीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्या दिशेने गोळीचे ५ राऊंड फायर केले. गोळ्या झाडत असताना एका मुलाच्या पायाला एक गोळी चाटून गेली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात पाहणी केली. अद्याप कोणताही आरोपी हाती लागला नाही. या प्रकरणी पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.