औरंगजेबाच्या कबरीला भेट देवून प्रकाश आंबेडकरांचे मुस्लिम कार्ड?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब हा सातत्याने वादाचा मुद्दा ठरत आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देवून मुस्लिम कार्ड खेळल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी भेट दिली. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद, जावेद कुरेशी, तय्यब जफर, सतीश गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजी नगर येथील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात अनेकदा राजकारण रंगले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरु असताना ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेल्या वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला सदिच्छा भेट दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांची अडचण होऊ शकते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात वंचित बहूजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर दोन दिवसीय संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.याच दरम्यान खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेब यांच्या कबरीला त्यांनी भेट दिली.त्यावेळी बोलताना ते म्हणाले “पर्यटन स्थळ असल्याने याठिकाणी भेट दिल्याचे आंबेडकर म्हणाले. याठिकाणी असलेल्या मारुती मंदिराला मी भेट देणार आहे. या मंदिराने आम्हाला खूप मदत केली आहे. भारताच्या दृष्टिकोनातून खुलताबाद महत्त्वाचं ऐतिहासिक शहर आहे. नावावरून जो काही भांडण लावण्याचा प्रकार सुरू आहे त्यांना मी एकच सांगतो की, औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं, ते कोणालाही मिटवता येणार नाही,” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.