खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली दीड लाख लाच; सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला अटक.
खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई आणि एका इसमावर लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. हा सर्व प्रकार निगडी पोलीस स्टेशन येथे घडला.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी महिलेने एका ओळखीच्या व्यक्तीला काही रोख पैसे आणि काही पैसे बँकेतून उसने दिले होते. परंतु, समोरील व्यक्तीने बँकेचे हप्ते न भरल्याने या महिलेने आपले पैसे परत मागितले. परंतु, सदर व्यक्तीने फिर्यादी महिलेविरुद्ध तक्रारीचा अर्ज दाखल केला.
हा अर्ज सहायक पोलीस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे यांच्याकडे तपासणीसाठी आला तेंव्हा अमोलने फिर्यादी महिलेकडे खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांची लाच मागितली. यासाठी पोलिस शिपाई सागर शेळके आणि सुदेश नवले यांनी मदत केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरीक्षक प्रविण निंबाळकर, पो.हवा. नवनाथ वाळके, पो.शि. सौरभ महाशब्दे, म.पो.शि. शिल्पा तुपे, आणि चालक पो.शि. पांडुरंग माळी, ला.प्र.वि. पुणे यांनी ही कारवाई केली.
पोलिस प्रशासनाचे आवाहन
कोणतेही शासकीय काम करण्यास कोणीही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांनी यावेळी केले आहे.