नियोजनबद्ध झाडांची कत्तल,अघोरी पद्धतीने झाडे जाळण्याचा धक्कादायक प्रकार,वनसंरक्षक कायद्याचे चिंचवड एमआयडीसी कॉलनीत उल्लंघन
काही वर्षांपूर्वी गर्द झाडी, खळखळता ओढा,असंख्य पक्ष्यांचा अधिवास असा लौकिक असणारा चिंचवड एमआयडीसी कॉलनीचा परिसर आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
प्रशासनाचे कागदी घोडे, आणि बेगडी पर्यावरण रक्षण कसे असते याचा अनुभव सध्या चिंचवडकर घेत आहेत.
पर्यावरण प्रेमी व पक्षीप्रेमीं मध्ये त्यामुळे नाराजीचा सूर आहे.एका बाजूला ओढ्याची हद्द, दुसऱ्या बाजूला रेल्वे ट्रॅक ,तिसऱ्या व चौथ्या बाजूला एम आय डी सी कॉलनीची संरक्षक भिंत यामुळे या परिसरात गेल्या ४० वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वृक्षसंपदा निर्मित होऊन छोटे “बायोडायवर्सिटी पार्क” चिंचवड परिसरात निर्माण झाले होते. त्यामुळे २० पेक्षा जास्त पक्षी या परिसरात दिसून येत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून होत असणारी नियोजनबद्ध झाडांची कत्तल आणि अघोरी पद्धतीने जिवंत झाडे जाळण्याचा प्रकार यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा नष्ट झालेली दिसून येत आहे.याकरिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाचा एक गट कार्यरत असून त्यामध्ये विजय मुनोत, विजय जगताप, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे हे अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील हे आहेत.यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षण करीत असताना त्यांना हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला.
या संदर्भात समिती अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील यांनी सांगितले की ” सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी नेहमी दिसून येणारी काळी शराटी, राखी धनेश, विविधरंगी चिमण्या,पोपट, बगळे, घार, साळुंकी, टिटवी, ढोकरी,करकोचा, पाणकोंबडी,कोकीळ, पावशा, भारद्वाज,गव्हाणी घुबड,धीवर(खंड्या),
बुलबुल, सुगरण, कोतवाल अश्या पद्धतीने २० पेक्ष्या जास्त पक्ष्यांचा अधिवास आता भविष्यात नजरेस पडणार नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक, पर्यावरण प्रेमी, पक्षी प्रेमी यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.
एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष,चुकीचे विकास नियोजन आणि नियमबाह्य वृक्षतोड यामुळे बिजलीनगर एमआयडीसी कॉलनी परिसरातील मोठा हरितपट्टा आता गायब झाला आहे.
महापालिका प्रशासन व राज्य शासनाच्या उद्योग विभागाला याची साधी खबरही नाही. झाडांची होत असलेली नियोजनबद्ध कत्तल आणि जाळून त्याची हॊत असलेली विल्हेवाट याचे सर्व प्रत्यक्ष पुरावे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जमा केलेले असून या संदर्भात पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करणे आवश्यक आहे.
भारतीय वनसंरक्षण कायदा तसेच महाराष्ट्र वनसंरक्षक कायद्याचे या प्रकारांमुळे उल्लंघन झालेले असून हा सर्व प्रकार तातडीने थांबविणे आवश्यक आहे. दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे.”असे विजय पाटील यांनी कळविले आहे.