औरंगजेबाच्या कबरीला भेट देवून प्रकाश आंबेडकरांनी शिवभक्तांच्या भावना दुखावल्या अटकेची मागणी : आनंद दवे
प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीपाशी जाऊन फुले वाहिली ह्या प्रकाराने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत व त्यांचा अपमान झाला आहे. राज्य सरकारने त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती त्यानंतर मीडिया मध्ये चर्चेला उधाण आले होते तेव्हा प्रतिक्रिया देताना दवे बोलत होते.
आनंद दवे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, आमचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांची क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन प्रकाश आंबेडकर यांनी शिवभक्तांना दुखावले आहे. किंबहुना प्रकाश आंबेडकर यांनी शिवभक्तांना आव्हानच दिले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण बिघडण्यापूर्वी राज्य सरकारने प्रकाश आंबेडकर यांच्यावर कठोर कारवाई करावी. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात कठोर कलमं लावून त्यांना अटक करावी, ही आमची मागणी असल्याचे आनंद दवे यांनी म्हटले.
यावर आता प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.