नागरिकांशी साधलेल्या करसंवादात ‘ऑन द स्पॉट’ निपटारा.. करदात्यांचा ‘ऑनलाइन’ व ‘ऑफलाइन’ संवादास उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने करदात्यांच्या मालमत्ताकरा बाबत शंका, प्रश्न व अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी नागरिकांशी ‘करसंवाद’ सुरू केला. महिन्याच्या प्रत्येक चौथ्या शनिवारी होणारा करसंवाद शनिवारी (दि. 17) पार पडला.
करदात्यांना जूनअखेरच्या सवलतींची माहिती मिळण्यासाठी आयोजित केलेल्या करसंवादास करदात्यांनी ‘ऑनलाइन’ व ‘ऑफलाइन’ पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.नागरिक आणि अधिकारी यांच्यातील थेटसंवादा मार्फत ‘अडचणींचा निपटारा’ असा उद्देश असलेल्या करसंवादाने, नागरिकांना प्रश्न विचारण्यासाठी दिलेली संधीचा आजपर्यंत शेकडो नागरिकांनी लाभ घेतला आहे. करदात्यांचे प्रश्न ऐकून त्यावर तातडीचा निपटारा, निरसन करून त्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश देऊन नागरिकांचा विभागाबाबत विश्वास निर्माण करण्याचे काम ‘करसंवाद’ उपक्रमाने केले आहे.
शनिवारी झालेल्या करसंवादमध्ये 40 पेक्षा जास्त नागरिकांनी ऑनलाइन व 30 पेक्षा जास्त नागरिकांनी विभागामध्ये येऊन विचारलेल्या प्रश्नाचे करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी निरसन केले.
उपयोगकर्ता शुल्क कशासाठी?अवैध बांधकाम शास्ती समायोजन कधीपासून? सामान्य करातील सवलती कोणाला व किती? विलंब शुल्क कधी पासून? अशा अनेक प्रश्नांचे निरसन करण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांनी दिलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.
‘ऑनलाइन’ माध्यमातून सहभागी झालेल्या प्रत्येक प्रश्नास देशमुख यांनी उत्तर दिले, सामान्य करात आगाऊ भरणा केल्यास 5 टक्के, ‘ऑनलाइन’ कराचा भरणा केल्यास 5 टक्के, महिलांच्या नावे असणाऱ्या एका निवासी मालमत्तेस 30 टक्के, दिव्यांग 50 टक्के, माजी सैनिकांना 100 टक्के, एसटीपी व ऑनसाईट कम्पोस्टिंग यंत्रणा 5 टक्के व झिरो वेस्ट व एसटीपी प्लांटसाठी 10 टक्के अशा सवलती असून,जूनअखेर मालमत्ताकराचा भरणा करण्याचे आवाहनही केले.‘उपयोगकर्ता शुल्क’ हे नागरिकांची पिळवणूक नसून, सरकारच्या आदेशानुसार नागरिकांना कचरा संकलन व विलगीकरण यासाठी मिळणाऱ्या सेवेसाठीचे शुल्क असल्याचे देशमुख यांनी सांगितले. महानगरपालिकेचा विकासकामातील खर्च आणि उपयोगकर्ता शुल्कातून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत आणि नागरिकांना सेवा देण्याचे शुल्क असल्याचे सांगत, त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले, “गतवर्षी महानगर पालिकेने 826 कोटींच्या वसुलीचा टप्पा पार केला. विभागातील कर्मचारी व शहरातील जागरूक नागरिक यांच्यामुळेच हा टप्पा आम्ही गाठू आणि पार करू शकलो. त्यामुळे 816 कोटींचा उच्चांक हे करदात्यांचे यश आहे. त्यामुळे चालू वर्षीही ज्या नागरिकांनी मालमत्ता करावरील सवलतींचा लाभ घेतला नाही,त्यांनी 30 जूनपूर्वीच या सवलतींचा लाभ घ्यावा.”
महापालिका मालमत्ता कराबाबत सवलतींचे आवाहन करण्यासाठी होर्डिंग्ज, पाम्लेट, रील्स स्पर्धा, सोशल मीडिया, रेडिओ जिंगल्स, रिक्षावरील आवाहनातून जनजागृती करीत आहे. या विविध माध्यमांतून मालमत्ताकराच्या सवलती व कराबाबत आदी सूचना देण्यात येत असून, नागरिकांनी जूनपूर्वीच मालमत्ताकराचा भरणा करावा, असे आवाहन देशमुख यांनी केले.