तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून 11 लाख 70 हजार रुपयांचा गांजा जप्त
पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे नगर रस्ता परिसरातून रविवारी (दि.18) गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून 11 लाख 70 हजार रुपयांचा 56 किलो गांजा जप्त केला आहे.त्यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.
राम राजेश बैस (वय 20, रा. रामपुरी वॉर्ड, कॅम्प परिसर, गडचिरोली), ऋतिक कैलास टेंभुर्णे (वय 21, रा. गौराळा, ता. लाखुंदर, जि. भंडारा) आणि निकेश पितांबर अनोले (वय 22, रा. कस्तुरबा वॉर्ड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक- 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, सहायक फौजदार शिवाजी घुले, रवींद्र रोकडे, संतोष देशपांडे, संदीप जाधव महेश साळुंखे, साहिल शेख, नितीन जगदाळे, अझीम शेख, दिनेश बास्टेवाड यांनी ही कारवाई (Pune) केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक – 2 मधील कर्मचारी नगर रस्त्यावरील खराडी भागात रविवारी गस्तीवर होते. त्यावेळी गडचिरोलीतील तिघेजण चंदननगर परिसरात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार चेतन गायकवाड आणि रवींद्र रोकडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.झडती दरम्यान त्यांच्याकडे गांजा आढळून आला. पोलिसांनी 55 किलो गांजा आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.