पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या सातबारा वरून निघणार ‘ते शिक्के’.मुख्यमंत्र्यांचे आदेश, खेड तालुक्यात जल्लोष.
खेड तालुक्यातील पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीवर गेले 40 वर्ष चासकमान व भामाआसखेड धरणाचे पाणी मिळत नसताना सातबारावर शासनाचे शिक्के होते. ते शिक्के काढण्याचा आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.शासनच्या या सकारात्मक प्रतिसादा नंतर काळुस (ता.खेड)या ठिकाणी सर्व बाधित शेतकऱ्यानी एकत्र येऊन एकच जल्लोष केला.भगवान श्री काळेश्वराचे दर्शन घेऊन वाजत गाजत मिरवणूक काढली व एकमेकांना पेढे भरून ह्या निर्णयाचे आनंदात स्वागत केले.
सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयावर व प्रश्नांवर चर्चा झाली. अनेक प्रश्न त्यामध्ये सोडविण्यात आले. त्यापैकी हा एक असल्याचे शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
खेड तालुक्यातील प्रदीर्घ प्रलंबित भामा आसखेड, चासकमान, प्रकल्प अंतर्गत चाकण, काळुस, मरकळ परिसरातील शेतजमिनीवर चाळीस वर्षांपूर्वी पुनर्वसनाचे टाकलेले शिक्के काढणे आणि सेझ प्रकल्प ग्रस्तांचा 15 टक्के परतावा प्रश्नांवर मुंबई सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत चर्चा झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आदेश दिले असल्याचे शेतकरी प्रतिनिधी गजानन गाडेकर, सुभाष पवळे, बाळासाहेब दौंडकर, विश्वास पोटवडे, मिनीनाथ साळुंखे, विठ्ठल आरगडे, संतोष खलाटे, संतोष पवळे, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, काशिनाथ हजारे यांनी सांगितले.
या बैठकीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार सुरेश धस, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी,उपस्थित होते.