संस्था चालकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण विषयावर गुरुवारी चर्चासत्राचे आयोजन
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद व पुणे विद्यार्थी गृह या संस्थांच्या वतीने संस्था चालकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण यावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येत्या गुरुवारी (दि. 22 जून) पुणे विद्यार्थी गृहाचे सभागृह येथे हे चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एक दिवसाच्या या चर्चासत्रात सहा ज्येष्ठ वक्त्यांची व्याख्याने तसेच मार्गदर्शक तत्वे, महाराष्ट्रातील उच्च व तंत्र शिक्षणासंबंधी सर्व शिक्षण संस्थांचे संस्थाचालक व प्राचार्य यांच्यासाठी असणार आहेत.
चर्चासत्राचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, महाराष्ट्र राज्याचे तंत्र व शिक्षण प्र-संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि विविध विद्यापीठाचे कुलगुरु सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये ‘एनईपी-2020’ची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आर. डी. कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य संचालक उच्च शिक्षण विभाग व सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, सदस्य डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. अनिल राव, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, महेश दाबक, राम सुब्रमण्यम् या तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणार आहे.
सुनील रेडेकर म्हणाले, “राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षण संस्था, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व औद्योगिक क्षेत्र यांची महत्वाची भूमिका आहे. या नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करताना येणारी आव्हाने व त्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी संस्था चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी हे चर्चासत्र महत्वपूर्ण ठरणार आहे.
पत्रकार परिषदेस संचालक प्रा. राजेंद्र कडुसकर, पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे आदी उपस्थित होते.