गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाचा तरुणांकडून पाठलाग.. तस्करांचा तरुणांवर हल्ला.. एका तरुणाचा जागीच मृत्यू
नांदेडमधील युवक तेलंगणातील लग्नावरुन परतत असताना त्यांना गोवंश तस्करी करणारे वाहन दिसले. युवकांनी पाठलाग करून तस्करी करणारे वाहन अडवले असता, तस्करांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास किनवट तालुक्यातील शिवणी अप्पारावपेठ जवळ ही घटना घडली. शेखर रामलू रापेल्ली असं हल्ल्यात मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे.
किनवट तालुक्यातून तेलंगणा राज्यात गोवंशाची मोठ्या प्रमाणात तस्करी होतं असते. या पूर्वीही गोरक्षकांनी अनेक वेळा गोवंशाची तस्करी करणाऱ्या गाड्या पकडल्या आहेत. सोमवारी रात्री तेलंगणात लग्न समारंभासाठी गेलेल्या युवकांना बोलेरो पिकअप टेम्पोतून गोवंशाची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या युवकांनी कारमधून गाडीचा पाठलाग केला. इस्लापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी अप्पाराव पेठ परिसरात युवकांनी वाहनाला अडवले.
या वाहनामध्ये गाई, बैल, कालवड आढळून आले. विचारपूस करत असताना तस्करांनी काठ्या आणि चाकूने युवकांवर हल्ला केला. यात शेखर रामलू रापेल्ली या युवकाचा जागीच मृत्यू झाला.तर महेश कोंडलवार, ज्ञानेश्वर कार्लेवाड, विशाल मेंडेवार, विठ्ठल अनंतवार, बालाजी राऊलवाड, सूर्यकांत कार्लेवाड हे युवक गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींना नांदेड आणि किनवट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.