संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल,मुख्यमंत्र्यांना इशारा देणं भोवलं
या प्रकरणी तुषार रमेश दामगुडे (रा. कात्रज) यांनी संतोष शिंदे याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाच्या दिवशी मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलिसांत वाद झाला होता. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही सरकारवर जोरदार टीका केली होती. याबाबत शिंदे यांनी समाज माध्यमात एक व्हिडिओ अपलोड केला. त्यात त्यांनी ‘हा लाठीचार्ज सरकारपुरस्कृत होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. माफी न मागितल्यास पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होऊ देणार नाही,’ असे म्हटले होते.
शिंदे यांनी जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पंढरपूर येथे दंगल घडवून आणणे, लोकसेवकाला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद आहे.