एसटीपी च्या कामाला वेग, उद्योगंत्री उदय सामंत यांच्याबरोबर जिल्ह्यातील संबंधित अधिका-यांची बैठक
चाकण, तळेगावदाभाडे, भोसरी एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया करुनच सोडले जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसी तर्फे उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) कामास वेग आला आहे.
पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत खासदार बारणे यांच्या पुढाकारातून उद्योगमंत्री सामंत यांच्यासोबत आज (मंगळवारी) मुंबईत बैठक झाली. बैठकीला उद्योग विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. एमआयडीसीचे रसायनमिश्रित पाणी थेट नदीपात्रात जावू नये यासाठी गुरुवारी (दि.22) सकाळी 11 वाजता उद्योगमंत्री सामंत हे पिंपरी महापालिकेत बैठक घेणार आहेत. आयुक्त, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आयुक्त, एमआयडीसीचे अधिकारी अशी संयुक्त बैठक होणार आहे.
नदी स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी इंद्रायणी, पवना नदी पात्राच्या अस्वच्छतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बारणे यांनी चर्चा केली होती. मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्र्यांना सूचना दिल्यानंतर आज बैठक झाली.
चाकण, तळेगाव दाभाडे, भोसरी एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी तसेच तळेगाव दाभाडे, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डमधील पाणी प्रक्रिया करुनच सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्याना सूचना दिल्या जाणार आहेत.नदीच्या उगमस्थानापासूनच नदीत सोडले जाणारे सांडपाणी अडविण्यात येणार आहे. प्रक्रिया करूनच पाणी नदीत सोडण्यासाठी ज्या गावातून नदी वाहते, त्या प्रत्येक गावातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शाळा यांना सोबत घेऊन नदी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.त्याकरिता नदी स्वछतेसाठी काम करणाऱ्या जलदिंडी प्रतिष्ठान व सिटिझन फोरमसह महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक देखील घेतली आहे असे बारणे यांनी सांगितले.