महाराष्ट्र :अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने राष्ट्रवादी समोर मोठा पेच.. प्रदेशाध्यक्षपदावर दावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेतेपद नको असल्याचं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या पक्षाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात पक्षाचे दिग्गज नेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात पुढील काळात कोणता मोठा बदल होणारी याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
१९९१ मध्ये लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलो. सहा महिने काम केले त्यानंतर ते सोडून महाराष्ट्रात आलो. आजपर्यंत आमदार, मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता ही पदे भूषवली. पक्ष संघटना मजबूत असेल तर सर्व काही होते असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकीत बीआरएस आणि वंचित यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. मागच्या वेळी वंचितमुळे आघाडीला फटका बसला. समविचारी मतांची विभागणी झाली तर त्यामुळे अडचण येते. हे सर्व बारकावे लक्षात घेतले पाहिजेत. यासाठीच बुथ कमिट्या सक्षम करण्याकडे लक्ष द्यायला हवे, असं अजित पवार म्हणाले.
पवार साहेबांनी आणि पक्षाने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मला विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्यात फार रस नव्हता. सर्व आमदारांनी सह्या केल्या व त्यांच्या आग्रहाखातर मी विरोधी पक्षनेता झालो. एक वर्ष हे पद सांभाळले. पण आता मला या पदातून मुक्त करा आणि मला पक्ष संघटनेची जबाबदारी द्या. आजपर्यंत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली आहे. यापुढे पक्षाने कोणतेही पद द्यावे, त्या पदाला न्याय द्यायचं काम करेन, असं अजितदादा म्हणाले.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात जयंत पाटील हे गेल्या ५ वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष असल्याचाही उल्लेख केला. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येक तीन वर्षांनी पद बदलण्यात येतं. यामुळे अजित पवारांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.