‘अटरली बटरली’’..अमूल गर्ल’चे जनक सिल्व्हेस्टर डिकुन्हा काळाच्या पडद्याआड
अमूल’ या प्रसिद्ध ब्रँडच्या ‘बटर’साठी ‘अटरली बटरली’ ही जाहिरात मोहीम १९६६मध्ये सुरू करणारे आणि त्यासाठी एक खट्याळ चेहऱ्याच्या, डोक्यावर एक रिबिन बांधलेली, फ्रॉक घातलेली आणि हातात ब्रेडचा एक स्लाइस घेत हसऱ्या चेहऱ्या च्या मुलीचे रेखाचित्र देऊन अमूल या ब्रँडला वेगळ्या उंचीवर नेणारे किमयागार सिल्व्हेस्टर डिकुन्हा यांचे मंगळवारी रात्री मुंबईत निधन झाले.
अमूल या ब्रँडला वेगळ्या उंचीवर नेणारे किमयागार सिल्व्हेस्टर डिकुन्हा जाहिरात क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती म्हणून ओळखले जात. ‘अमूल’बरोबर ते १९६०पासून संलग्न होते.यांनी अमूल जाहिरातीत योजलेले लहान मुलीचे रेखाचित्र हीच ‘अमूल बटर’ची ओळख बनले आणि ही मुलगी ‘अमूल गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली.
त्याआधी बटरशी संबंधित जी चित्रे वापरली जात असत ती काहीशी नीरस होती. ‘बटर हे उत्पादन डोळ्यांसमोर ठेवून थेट स्वयंपाकघरात जाणारी आणि भारतीय गृहिणींच्या मनावर राज्य करू शकणारी अशी लाघवी मुलगी तयार केली,’ असे डिकुन्हा यांनी एके ठिकाणी सांगितले.
१९६९मध्ये देशात फोफावलेल्या हरे कृष्णा चळवळीवर डिकुन्हा यांनी भाष्य केले. त्या वेळी अमूलच्या जाहिरातीत त्यांनी ‘हरी अमूल हरी हरी’ ही ओळ वापरली, जी खूप गाजली होती. अमूल गर्लचे रेखाटन करणारे जयंत राणे आणि जाहिरात मजकूर लिहिणारे मनीष झवेरी यांची सिल्व्हेस्टर डिकुन्हा यांना चांगली साथ लाभली. डिकुन्हा यांना ‘अमूल इंडिया’च्या मार्केटिंग विभागाचे महाव्यवस्थापक पवन सिंग यांच्यासह उद्योगजगतातील अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.