महानगरपालिका:उपायुक्त स्मिता झगडे रजा मंजूर नसताना परदेश दौऱ्यावर,५ एप्रिल पासून पद रिक्त.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीने उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या स्मिता झगडे यांची अर्जित रजा मंजूर नसताना परदेशात गेल्या असून 5 एप्रिलपासून महापालिका सभा, स्थायी समितीच्या बैठकीला अनुपस्थित आहेत.उप आयुक्त पदासारख्या महत्वाच्या पदावर काम करत असलेल्या झगडे यांच्याकडे नागरी सुविधा केंद्र विभागाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
स्थायी समिती, सर्व साधारण सभेत नागरी सुविधा केंद्राकडील सारथी, पी.जी.पोर्टल आदी बाबत आढावा घेण्यात येतो. त्यामुळे नागरी सुविधा केंद्र उपआयुक्त म्हणून झगडे यांनी बैठकीला उपस्थित असणे आवश्यक आहे.
परंतु झगडे यांच्याकडे नागरी सुविधा केंद्राची पदस्थापना दिल्यापासून म्हणजे 5 एप्रिलपासून त्या अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा अहवाल नियंत्रण अधिकारी अतिरिक्त आयुक्त 3 यांच्यामार्फत प्राप्त झालेला आहे.तसेच अर्जित रजा मंजुरीचा आदेश प्राप्त नसताना झगडे या परस्पर परदेशात गेल्याने कार्यालयात उपस्थित राहिल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे उपायुक्त झगडे यांचा पालिका सेवेतील प्रतिनियुक्तीचा कालावधी तात्काळ संपुष्टात आणून त्यांची सेवा शासन सेवेत प्रत्यार्पित करण्यात यावी, असे पत्र आयुक्त सिंह यांनी नगरविकास विभागाला पाठविले आहे.
महापालिकेत स्मिता झगडे या 6 जानेवारी 2018 मध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर शासन प्रतिनियुक्तीने रुजू झाल्या आहेत. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2021 मध्ये झगडे यांचे उपआयुक्त पदावर पदोन्नती झाली.