पिंपरी चिंचवड पोलिस:नागरिकांना पोलीस ‘खाकी’ मध्येच दिसणार…आयुक्तांचे आदेश
शहरातील स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ‘व्हिजीबल पोलिसिंग’वर भर दिला आहे. नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी पोलीस खाकीमध्ये नागरिकांना दिसणे आवश्यक आहे.व्हिजीबल पोलिसिंग आणि प्रभावी गस्त यातून गुन्हेगार तसेच समाजकंटक यांच्यावर वचक निर्माण करण्यावर पोलिसांचा भर असणार आहे.
त्यामुळे पोलिसांनो तुम्ही फक्त असून चालणार नाही तर दिसलात पण पाहिजे
घरातून निघाल्यावर पोलीस ठाण्यात येईपर्यंत आणि घरी जाताना अनेक कर्मचारी गणवेशावरून शर्ट-जॅकेट परिधान करतात. सकाळी साडेसात ते आठ वाजता घरातून निघणारे पोलीस ठाण्यात येताना जर युनिफॉर्मवर असतील तर व्हिजीबल पोलिसिंग राहून त्यामुळे सकाळच्या वेळात होणाऱ्या गुन्ह्यांना काही प्रमाणात अटकाव बसेल.
त्याचबरोबर रात्री घरी परतत असताना पोलिसांनी युनिफॉर्मवरून अन्य कपडे परिधान न केल्यास 24/7 चालणाऱ्या गस्तीसह पोलिसांचा वावर वाढलेला दिसून येईल.
रस्त्यावर पोलिसांचे अस्तित्व दिसून यावे, यासाठी पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार कर्तव्यावर ये- जा करताना गणवेशावर राहतील, असे आयुक्तांनी सूचित केले आहे. तसेच, कोणीही साध्या कपडयात कर्तव्यावर येणार नाही, याची दक्षता वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांनी घ्यायची आहे.
परिमंडळीय पोलीस उपआयुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त यांनी पोलीस ठाणे भेटीदरम्यान याबाबत खातरजमा करणे पोलीस आयुक्तांना अपेक्षित आहे.मागील काही दिवसांपासून शहरात पोलिसांची पायी पेट्रोलिंग सुरू आहे. ज्यामुळे गल्लीबोळात पोलिसांचा चांगल्या प्रकारे वावर दिसून येत आहे. मागील काही दिवसात अपवाद वगळता रस्त्यावर मोठ्या घटना घडल्याची नोंद नाही.
पोलीस ठाण्यांमधील ठराविक तीन ते चार कर्मचारी सोडले तर अन्य 100 हून अधिक पोलिसांना दररोज गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या गुन्हे शाखेसह विशेष शाखेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना गणवेश परिधान करण्यापासून काही ठराविक कारणांसाठी मुभा दिलेली असते.
मात्र, ज्यांना गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे असे पोलीस अधिकारी-कर्मचारी हे घरी जाताना-येताना गणवेशावरून अन्य कपडे घालत असल्याने त्यांना हे आदेश लागू करण्यात आले आहेत.शहरातील मर्मस्थळे, धार्मिक स्थळे, महत्त्वाचे चौक ठिकाणे यासाठी पोलिसांनी क्युआर कोड लावले असून, तेथे दररोज काही ठराविक वेळांमध्ये पोलिसांनी भेट देऊन हे क्युआर कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे कोणता पोलीस कर्मचारी-अधिकारी किती वाजता त्याठिकाणी भेट देऊन गेला आणि त्यामुळे तेथे कोणताही बाका प्रसंग घडणार नाही याची खबरदारी घेतली गेली हे अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना क्षणोक्षणी समजणार आहे.