निगडित पलटी झाला गॅस टँकर
निगडी येथील एसबीआय बँकेच्या समोर भक्ती-शक्ती पुलाजवळ मुंबई वरून पुण्याच्या दिशेने जाणारा भारत पेट्रोलियम गॅसचा टँकर आज (रविवारी) पहाटे तीनच्या सुमारास उलटला आहे. यामुळे परिसरात गॅस पसरून धोका होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून अग्निशमनदल व पोलिसांनी घटनास्थळी जात जवळपासचा 300 मीटर पर्यंतचा परिसर पुर्णपणे बंद केला आहे. गॅसचा हा टँकर उलटला तेव्हा या परिसरात खूप मोठा आवाज आला.
पहाटे तीनची वेळ असल्याने या मोठ्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात टँकरचा चालक गंभीर जखमी असून त्याला त्वरीत पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या,भारत पेट्रोलियमची टीम, निगडी पोलीस,आपत्ती व्यवस्थापनचे पथक दाखल झाले आहे. जो लिक्वीड गॅस रस्त्यावर सांडला होता त्यावर त्वरीत अग्निशमन दलाने पाणी टाकले आहे. तसेच अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसरा टॅंकर मागवून मशीनद्वारे त्यात भरला जात आहे.
खबरदारी म्हणून 300 मीटर पर्यंत म्हणजे पूना गेट ते पवळे पुलापर्यंत सर्व परिसर , वाहतूक बंद कऱण्यात आली आहे. दुकाने बंद असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिली आहे. दहा पर्यंत गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरला जाईल त्यानंतर सर्व दळणवळण पूर्ववत होईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. यात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसून धोका तुर्तास टळला आहे.
.