वीज दर प्रणालीत होणार महत्त्वपूर्ण बदल.. ऊर्जा संसाधनांचा अधिक चांगला वापर
भारत सरकार कडून सध्या देशात लागू असलेल्या वीज दर प्रणालीमध्ये आता महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वीज मंत्रालयाने वीज ( ग्राहकांचे हक्क) नियम, २०२० मध्ये टाइम ऑफ डे टॅरिफ प्रणाली लागू करण्यासाठी आणि स्मार्ट मीटरिंगचे नियम सुलभ करण्यासाठी दुरुस्तीची घोषणा केली. ऊर्जा मंत्रालयाने सांगितल्यानुसार, हे नवीन नियम लागू झाल्यानंतर दिवसाच्या वेळेनुसार विजेचे वेगवेगळे दर निश्चित केले जातील. आता ग्राहकांना दिवसभर एकाच दराने वीज द्यावी लागणार नाही.
दिवसा सहसा वीज दिव्यांसाठी कमी वापरली जाते. सूर्योदय ते सूर्यास्ताच्या साधारण आठ तासांच्या कालावधीत, उजेड भरपूर असतो. या कालावधीला राज्य विद्युत नियामक आयोगाने सौर तास असे संबोधले आहे. यादरम्यान वीज दर सामान्य दरापेक्षा १०%- २०% कमी असतील. तर सर्वाधिक विजेच्या वापराच्या काळात, म्हणजेच ‘पीक अवर्स’ दरम्यान वीज दर १०% ते २० टक्के जास्त असेल.
ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांच्या मते, टाइम ऑफ डे या निकषावरील दर प्रणाली सुरू केल्याने वीज बिल कमी होईल. यामुळे ऊर्जा संसाधनांचा अधिक चांगला वापर होईल. ऊर्जा मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की १ एप्रिल २०२४ पासून १० किलोवॅट्स किंवा त्याहून अधिक वापरणाऱ्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी टाइम ऑफ डे दर लागू होईल.
१ एप्रिल २०२५ पासून, कृषी क्षेत्रातील ग्राहक वगळता, सर्व वीज ग्राहकांसाठी त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक असेल. बहुतांश राज्य वीज नियामक आयोगांनी मोठ्या व्यावसायिक आणि औद्योगिक श्रेणीतील ग्राहकांसाठी टाइम ऑफ द डे ही नवी दरप्रणाली सुरू केली आहे. यासोबतच स्मार्ट मीटरिंगचे नियमही सुलभ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये किंवा होणारा त्रास टाळण्यासाठी जास्तीत जास्त अनुज्ञेय भारापेक्षा जास्त वीजेची मागणी करण्यासाठी सध्याचा दंडही करण्यात आला आहे.