एकमेकांना विरोधात वक्तव्ये न करण्याची काँग्रेस मंत्र्यांना दिली समज
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना त्यांच्या मंत्र्यांना एकमेकांविरोधात वक्तव्ये करण्यापासून रोखण्याची सूचना राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी केली आहे. ते म्हणाले की, आपल्या मंत्र्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, ते या प्रकरणी पक्षपातळीवर लक्ष घालतील.
गुरुवारी उदयपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना धारीवाल यांनी रखडलेल्या विकास कामाला जयपूरचे सहा आमदार आणि तीन मंत्री जबाबदार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, राजस्थानात कोटा, जयपूर, अजमेर आणि उदयपूर या चार शहरांमध्ये स्मार्ट सिटी मिशन सुरू करण्यात आले होते, परंतु स्थानिक आमदार आणि मंत्र्यांमध्ये समस्या असल्याने या कामाची गती मंदावली.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रताप सिंह खाचरिया यांनी स्मार्ट सिटीच्या कामाच्या गतीबद्दल जयपूरचे आमदार आणि मंत्र्यांना दोष दिल्याबद्दल नगरविकास मंत्री शांती धारिवाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. तेव्हापासून काँग्रेसच्या मंत्र्यांची एकमेकांच्या विरोधातील टीका चांगलीच चर्चेत आली होती.त्याविषयी रंधावा यांना पत्रकारांनी विचारले असता म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. मंत्र्यांनी एकमेकांच्या विरोधात टीकाटिप्पणी करणे हे पक्ष शिस्तीला धरून नाही.