अनधिकृत शाळांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कारवाई
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. अशा शाळांना महापालिका शिक्षण विभागाने नोटीस बजावल्या आहेत.तसेच नव्याने शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये आठ अनधिकृत शाळा आढळून आल्या आहेत. या शाळांना बंद करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. अशा शाळांवर अंतिम कार्यवाही करण्यास २१ जूनपर्यंत शेवटची मुदत दिली होती. पण, महापालिकेकडून वारंवार सूचना देऊनही अद्याप काही शाळांनी त्रुटी दूर करून मान्यता घेण्यास टाळाटाळ केली आहे. या अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी संबंधित शाळेच्या संस्थांना दरवर्षी नोटीसही बजावल्या आहेत. मात्र, या नोटीसकडे दुर्लक्ष करत या शाळा राजरोसपणे सुरू आहेत. संबंधित शाळांना नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पर्यवेक्षकांनी दिलेले आहे.यासाठी पर्यवेक्षकांचे पथक नेमले आहे.
शाळांकडून प्रती दिन १० हजार रुपये दंड वसूल करण्याचे काम सुरू आहे. तरी ज्या शाळा दंड भरण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा शैक्षणिक संस्थांच्या इमारतीवर महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून बोजा चढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अनधिकृत शाळाना परवानगी घेण्याच्या सूचना देऊनही त्यांच्याकडून शासन मान्यता प्रमाणपत्रांची पूर्तता झाली नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सर्व खाजगी अधिकृत शाळांना शासन मान्यतेच्या आदेशाची प्रत शाळेच्या दर्शनी भागावर लावण्याच्या सूचना दिली आहे. तरी, काही शिक्षण संस्थांकडून आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, संजय नाईकडे, म्हणाले की “तपासणी अहवालात आठ शाळा अनधिकृत आढळून आल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यातील काहींनी शासन मान्यतेची पूर्तता केली असून काही अद्यापही अनधिकृतच आहेत. अशा शिक्षण संस्थांच्या इमारतींवर बोजा चढविण्यात येणार आहे. तसे आदेश संबंधित शिक्षण संस्थांना देण्यात आले आहेत. तथापि, पालकांनी अनधिकृत शाळेत पाल्यांना प्रवेश देऊ नये.