देश: आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना सुट दिल्यावरून योगेश्वर – विनेशमध्ये रंगली ‘ शाब्दिक कुस्ती’
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अॅड हॉक समितीने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगाट, सत्यव्रत कडियन व जितेंदर किन्हाया कुस्तीपटूंना आशियाई स्पर्धेसाठी पात्रता फेरीशिवाय पात्र होता येईल अशी सूट दिली. त्यानंतर कुस्तीपटूंच्या पालकांकडून तसेच काही प्रशिक्षकांकडून नाराजीचा सूर उमटू लागला. त्यावेळी माजी कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना सुट दिल्यावरून टिकास्त्र सोडले.त्यानंतर आंदोलक फोगाटनेही त्याच्यावर विनेश टीकेचा बाण सोडल्याने या दोघांमध्येशनिवारी शाब्दिक कुस्ती पाहायला मिळाली.
विनेश फोगाटकडून प्रत्त्युत्तर
योगेश्वर दत्तची महिला कुस्तीपटूंसाठी तयार करण्यात आलेल्या समितीत निवड करण्यात आली होती.या समितीसमोर महिला कुस्तीपटू आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत सांगत होती, तेव्हा योगेश्वर हसत होता. योगेश्वरने त्यावेळी महिला कुस्तीपटूला स्पष्ट सांगितले की, अशा गोष्टी होतच राहतात. हे प्रकरण लांबवू नका. त्याने कुस्तीपटूंच्या घरी फोन करून आपल्या मुलींना समजावून सांगा, अशी धमकीही दिली असल्याचेही विनेशने म्हटले आहे. तसेच तिने योगेश्वरचा भाजपाचा नेता असा उल्लेख करत तो चुकीची माहिती पसरवत असल्याचा व त्याने या प्रकरणातील महिला कुस्तीपटूंची नावे सार्वजनिक केल्याचाही आरोप केला आहे.
योगेश्वर दत्तने मांडली बाजू
अॅड हॉक समितीकडून नियमाविना सहा कुस्तीपटूंना सूट देण्यात आली आहे. जर सूट द्यायचीच असेल तर, रवी दहीया, दीपक पुनिया, सोनम मलिक,अंशू मलिक या पदक विजेत्यांनाही सूट द्यायला हवी. अॅड हॉक समितीने कोणत्या निकषांवर सहा खेळाडूंना सूट दिली ? हे समजण्यापलीकडे आहे. सूट देण्यात आलेले सहाही कुस्तीपटू एक वर्ष मॅटपासून दूर आहेत. त्यांनी या वर्षाभरात अंदोलन सोडून किती सराव केला हे त्यांचे त्यांनाच माहीत आहे. असे असताना त्यांनाच सुट का? इतरांनी काय केले आहे ? त्यामुळे इतर कुस्तीपटूंनी याविरोधात आवाज उठवणे गरजेचे असल्याचे योगेश्वरने म्हटले आहे.