९७अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विख्यात कादंबरीकार मा. डॉ रविंद्र शोभणे यांची निवड
साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड जाहीर झाली असून संमेलन अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या तारखाही निश्चित झाल्या आहेत.
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार आहे. पुणे येथे रविवारी झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत रवींद्र शोभणे यांचे नाव निश्चित करण्यात आले. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावेही अध्यक्ष पदासाठी चर्चेत होती. परंतु शोभणे यांचे नाव बहुमताने निवडण्यात आले. बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही विचार करण्यात आला. २ फेब्रुवारी २०२४ पासून हे साहित्य संमेलन होणार आहे. २,३ आणि ४ फेब्रुवारी दरम्यान साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी दिली.
कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यात झाला. नरखेड तालुक्यात खरसोली या गावी त्यांचा जन्म झाला. खरसोलीच्या आदर्श विद्यालयातून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण नरखेड येथे तर पदव्युत्तर शिक्षण नागपूर येथील मॉरिस महाविद्यालयात केला. १९८९ मध्ये त्यांनी पीएच.डी. ची पदवी मिळवली. कथालेखक म्हणूनही ते परिचित आहेत. १९९१ मध्ये त्यांचा ‘वर्तमान’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला.
डॉ. रवींद्र शोभणे यांना अनेक प्रकारचे सन्मान मिळाले आहेत. यापूर्वी यवतमाळमधील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्यांकडे होते. तसेच मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्यपदी ते होते. सन २००७ ते २०१२ यादरम्यान ते या पदावर होते.अमळनेरमध्ये होते आहे दुसऱ्यांदा संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १८७८ मध्ये प्रथम पुणे शहरात झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे होते. जळगाव जिल्ह्यात पहिले संमेलन १९३६ मध्ये झाले. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. अमळनेरमध्ये पहिले संमेलन कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ मध्ये झाले होते. त्यानंतर आता अमळनेर २०२४ मध्ये दुसऱ्यांदा हे संमेलन होत आहे. अमळनेर साने गुरुजी यांची कर्मभूमी आहे.