मुलीला मारहाण करीत असताना वडिलांनी मध्यस्थी केल्यामुळे त्यांना जावयाकडून मारहाण
मुलीला मारहाण करीत असताना मध्यस्थी केली म्हणून जावयाने थेट सासऱ्यालाच लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना शनिवारी ( दि.24) चाकण हद्दीतील खडूस गावात घडली.
याप्रकरणी रंगनाथ केशव तयार (वय 55 राहणार काळुस ता खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जावई समीर मुरलीधर गाडेकर (वय 42 रा. राजगुरुनगर) व त्याचा मित्र अनिल बबन ढेरे (वय 41) यांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादीच्या मुलीला जावयाने माहेरी आली असता मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी हे भांडणे सोडवण्यासाठी गेले. याचा राग येऊन आरोपीने त्याच्या मित्राला बोलावले व दोघांनी लाकडी दांडके व हातात कोयता घेऊन दहशत पसरवली. तसेच फिर्यादी यांचे हात पकडून त्यांच्या खांद्यावर व डोक्यावर लाकडी दांडक्याने मारून त्यांना गंभीर जखमी केले. चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.