डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा आज पासून सुरू,वरिष्ठ विभागीय सात संघांसह १४ संघांचा सहभाग
मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर उद्या सोमवारपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेला सुरुवात होत असून, स्पर्धेत वरिष्ठ विभागीय गटातील सात संघांसह एकूण १४ संघ सहभागी होणार आहेत.
डॉ. आंबेडकरांच्या १३२व्या जयंती निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन हॉकी महाराष्ट्राच्या मार्गदर्शना खाली करण्यात येत आहे. स्पर्धा पूर्णपणे बाद फेरी पद्धतीने खेळविण्यात येईल .स्पर्धेत आयकर, पुणे,एक्सलन्सी हॉकी अकादमी,क्रीडा प्रबोधिनि,मध्य रेल्वे, पुणे, जीएसटी-कस्टम्स, पुणे शहर पोलिस, रेल्वे पोलिस लाईन बॉईज, पीसीएमसी अकादमी असे वरिष्ठ गटातील संघ सहभागी होणार आहेत. बरोबरीनेच खडकी हॉकी अकादमी, किडस इलेव्हन, फ्रेंडस युनियन, हॉकी लव्हर्स अकादमी, हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लब, पूना हॉकी अकादमी असे कुमार गटातील संघही सहभागी होणार आहेत.दररोज दोन सामने होणार असून, अंतिम सामना रविवार २ जुलै रोजी खेळविण्यात येईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा समितीचे अध्यक्ष महेंद्र निकाळजे यांनी दिली.
विजेत्या, उपविजेत्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आकर्षक करंडकासह अनुक्रमे रोख २०, १० आणि ५ हजार रुपयाची पारितोषिके दिली जाणार आहेत.