पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, दोघांची प्रकृती गंभीर
पुणे-सोलापूर महामार्गावरील खेडेकर मळा (उरुळी कांचन )परिसरात आयशर टेम्पो, चारचाकी कार आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. टेम्पो हा पुण्याच्या दिशेकडे जात होता तर चारचाकी गाडी हि सोलापूरच्या दिशेने निघाली होती. टेम्पोमध्ये बांधकाम साहित्याच्या लोखंडी प्लेट होत्या. टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सोलापूरच्या बाजूने निघालेल्या चारचाकी कारवर जाऊन आदळला तसेच बाजूने जाणाऱ्या एका दुचाकीलाही त्याने धडक दिली.
अपघात एवढा भीषण होता की, टेम्पो हा चारचाकी गाडीच्या बोनेटवर जाऊन थांबला. यावेळी गाडीत असलेल्या पती -पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांना किरकोळ जखम झाली आहे. तर टेम्पोतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून दुचाकीवरील व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हि घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली असून सुरळीत करण्याचे काम सुरू होते. अपघातग्रस्त व्यक्तींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्णवाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक हॉस्पिटल, झेड प्लस हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनांवरील अतिवेग हे अपघाताचे महत्वाचे कारण होत असून चालकांनी वाहने नियंत्रणात चालवण्याची आवश्यकता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.