देश: ..मात्र वाघ शिकारीला एकटाच जातो…स्मृती इराणी यांचा विरोधक ऐक्याला टोला
लांडगे कळपाने शिकार करतात.मात्र वाघ शिकारीला एकटाच जातो. हा निसर्गाचा नियमच आहे, त्यामुळे विरोधी एकजुटीचा आता काहीही उपयोग होणार नाही. समस्त भारतीयांसह साऱ्या जगानेच आता मोदींचे कर्तृत्त्व मान्य केले आहे अमेरिका आणि इजिप्त भेटीत हे दिसून आले आहे. यामुळे वर्ष २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपासह मोदींना कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केले आहे.
मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. इराणी म्हणाल्या की, विरोधकांच्या एकजुटीचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून देशातील जनता आणि सरकारी तिजोरी आहे. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यामुळे जगात भारताची विश्वासार्हता वाढली आहे आणि विविध परदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याच्या घोषणा केल्या आहेत.
बिहारच्या पाटणा येथे झालेल्या बैठकीत एकूण १७ विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भगव्या पक्षाचा पराभव करण्यासाठी एकजुटीने लढण्याचा आणि मतभेद विसरून लवचिकतेने काम करण्याचा संकल्प केला. या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, हा विचारधारेचा लढा असून आम्ही एकत्र उभे आहोत. आमच्यात काही मतभेद असू शकतात, पण आम्हाला एकत्र काम करायचे आहे.