पुणे महापालिकेचा BRT मार्ग हटवण्याचा निर्णय
पुणे – नगर रस्त्यावरील येरवडा ते रामवाडी दरम्यानच्या जलद बस वाहतूक सेवेच्या (बीआरटी) मार्गिकेमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सूचना दिल्यानंतर महापालिकेने ‘बीआरटी’ मार्ग काढण्यास सुरुवात केली आहे.
पुणे – नगर रस्त्यावर येरवडा ते ‘आपले घर’ दरम्यान ‘बीआरटी’ कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, ‘मेट्रो’ चे काम सुरू असल्यामुळे येरवडा ते वडगाव शेरीपर्यंत ‘बीआरटी’चा मार्ग बंद करण्यात आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरील ‘बीआरटी’ पूर्णपणे कार्यान्वीत नव्हती आणि त्यातच रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होत नसल्यामुळे ‘बीआरटी’ मार्ग बंद करा अथवा त्यामधून खासगी वाहनांना प्रवेश द्या, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’चा ‘बीआरटी’ बंद करण्याला विरोध होता.
या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यावेळी येरवडा ते रामवाडी दरम्यानची ‘बीआरटी’ योग्य नसल्याचे दिसून आले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी अनुमती दिल्यानंतर महापालिकेने शनिवारपासून ‘बीआरटी’ काढण्यास सुरुवात केली.