पुणे:पावसाळी पर्यटनासाठी सिंहगडावर गर्दी, वन विभागाने बंदोबस्त वाढविला
पावसाळी पर्यटनासाठी पुणेकर, पिंपरी – चिंचवडकर व आसपासच्या परिसरातील पर्यटक दरवर्षी सिंहगडावर भ्रमंती करीत असतात. शहरात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने तसेच शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस सुटी असल्यामुळे गडावर गर्दी झाली होती. कॉलेजमधील मित्रांबरोबरच, सहकुटुंब भटकंतीला आलेल्यांची संख्याही मोठी होती. सिंहगड आणि लगतच्या डोंगररांगावर धुक्याची झालर पसरल्याने पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. मनसोक्त भटकंती केल्यानंतर आल्हाददायक वातावरणात पिठलं-भाकरी आणि गरमागरम कांदाभजीचा आस्वादही घेतला.
पर्यटकांची गर्दी वाढणार, याचा अंदाज आल्याने वन विभाग, संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांनी गडावरील बंदोबस्त वाढवला होता. गडावरील पार्किंगची मर्यादा संपल्यावर वन कर्मचाऱ्यांनी पायथ्याला गाड्या रोखून धरण्याची सूचना दिली. जेवढ्या गाड्या खाली जातील, तेवढ्याच वर पाठविण्यात आल्या. त्यामुळे वेळी घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली नाही.शनिवारी आणि रविवारी दोन दिवसांत गडावर 2 हजार 433 दुचाकी आणि 1 हजार 127 चारचाकी खासगी गाड्यांची नोंद झाली. सिंहगडाबरोबरच नागरिकांनी पानशेत, खडकवासला चौपाटीवरही गर्दी केली होती.