पुणे – लोणावळा – पुणे लोकलच्या चार फेऱ्या रद्द , सोमवार (दि.26) ते बुधवार (दि.29) रेल्वेचा इंजिनिअरिंग ब्लॉक
इंजिनिअरिंग ब्लॉकमुळे तीन दिवस सोमवार ते बुधवार पुणे – लोणावळा – पुणे लोकलच्या चार फेऱ्या रद्द केल्या आहेत. दुपारच्या सत्रातील लोणावळा ते पुणे जाणाऱ्या दोन लोकल व पुणे ते लोणावळाला जाणाऱ्या सकाळच्या सत्रातील दोन लोकल अशा चार फेऱ्या रद्द कऱण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
लोणावळा स्थानकावरुन 2.50 व 3.30 या दुपारी सुटणाऱ्या दोन लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर पुण्याहून 9.57 व 11.17 वाजताच्या सकाळी सुटणाऱ्या लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार लोणावळा रेल्वे स्थानकावरून सकाळी 10.05 ची लोकल सुटल्यानंतर पुढची लोकल थेट सायंकाळी 5.30 वाजता म्हणजे साडेसात तासांनी सुटणार आहे.
सदरच्या गाड्या रद्द झाल्याने नागरिकांचे , शाळकरी मुले व कामगार वर्गाचे प्रचंड हाल होणार असल्याचे पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी सांगितले. नागरिकांनी देखील याची नोंद घेत दुपारच्या वेळेत अन्य सार्वजनिक प्रवासी वाहनांनी प्रवास करत गैरसोय टाळावी, असे आवाहन कऱण्यात आले आहे.