‘वाट चुकलेल्या ‘ सिंहगड टेक्निकलच्या चार विद्यार्थ्यांची स्वयंसेवी संस्थांकडून सुखरूप सुटका
मंगळवारी ढाक भैरीच्या गडावर ट्रेकिंगसाठी आलेले विद्यार्थी रस्ता चुकले.रस्ता भरकटलेल्या या चार जणांची शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांचे स्वयंसेवक, कामशेत पोलीस व कोंडेश्वर ग्रामस्थ यांनी सुखरूप सुटका केली.
काळाकुट्ट अंधार,त्यात बरसणारा धुवांधार पाऊस, पडलेले दाट धुके या तिहेरी संकटामुळे बचाव पथकाला शोध घेताना अनेक अडचणीचा सामना करावा लागला.
सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्युट वडगाव येथे शिक्षण घेत असलेले कबाडे,सुमीत शेंडे, आमोल मोरे,आदित्य सांगळे, हे चौघे कोंडेश्वर मार्गे धाक भैरीवर चढाई सुरु केली.गड चढत असतानाच चौघेही रस्ता चुकले. परतीचा मार्ग त्यांच्या लक्षात येईना. आपण चुकलोय हे समजताच त्यांनी अनेकांना मदतीसाठी फोन केले. त्यानंतर, शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सुनिल गायकवाड, महेश म्हसणे, योगेश उंबरे, रतन सिंग, हर्ष तोंडे, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष गणेश निसाळ, गणेश ढोरे, विनय सावंत, सत्यम सावंत, शुभम काकडे, कमल परदेशी, जीगर सोलंकी, विकी दौंडकर, साहील नायर व पोलीस पाटील यांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला मंगळवारी रात्री नऊ वाजता सुरू केलेली शोध मोहीम अखेर चार तासाच्या अथक शोधानंतर बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास संपली व रस्ता चुकलेले हे चौघे कुसुर पठाराजवळ आढळले.
ढाक भैरी हा सह्याद्री पर्वतरांगेतील चढाई करण्यास अतिशय अवघड असा किल्ला मानला जातो.बचाव पथकाने काळाकुट्ट अंधार, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्याचा सामना करीत चौघांची सुटका केली.चारही मुलांना प्यायला पाणी देवून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यानंतर सर्वजण सुखरूप गड उतरले.