महापालिकेकडून गृहनिर्माण संस्था समस्या निवारण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
महापालिके मार्फत शहरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये विविध मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील या गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नोडल अधिकारी व सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
नोडल अधिकारी म्हणून भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक आणि सहाय्यक समन्वय अधिकारी म्हणून स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या गृहनिर्माण संस्थांचे घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, जलःनिसारण, कर आकारणी व कर संकलन, विद्युत व रस्त्यांची विविध कामे अशा विविध कामकाजाचा कार्याभ्यास व कार्याचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. नोडल अधिकारी व समन्वय अधिकाऱ्यांनी हा कृती आराखडा तयार करून आयुक्त सिंह यांना सादर करावा, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी जारी केला आहे.