महाराष्ट्र :टाळ,मृदंगाच्या गजराने विठूनगरी दुमदुमली-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न
“विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा” लाखो भक्तांच्या विठू गजराने अवघी पंढरपूरनगरी आज विठुमय झाली आहे.आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहाटे संपन्न झाली.
यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला मान मिळाला आहे. भाऊसाहेब आणि मंगल काळे गेल्या पंचवीस वर्षापासून पंढरपूरची वारी पायी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दाम्पत्य पंढरीची वारी करतात. भाऊसाहेब काळे हे शेतकरी आहेत. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हत मुख्यमंत्री यांच्यासोबत हा मान मिळेल अशी भावना काळे दाम्पत्याची व्यक्त केलीय.
सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठलाच्या महापूजेचं भाग्य मला मिळालं,अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.यावेळी ते म्हणाले. 30 जूनला सरकारला एक वर्ष होईल. गेल्यावेळी सरकार बनवलं आणि मी महापूजेसाठी आलो होतो. विठुरायाचा कृपेने सर्व सुरळीत सुरू असून सरकार वर्ष पूर्ण करणार.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, चांगला पाऊस होऊ दे, राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ देत हे साकडं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पांडुरंगाच्या चरणी केली.
यंदाच्या महापुजेचे विशेष म्हणजे अगदी महापूजा सुरु असतानाही भाविकांना विठुरायाचं दर्शन घेता येत आहे. . इतिहासात पहिल्यांदाच असा एखादा निर्णय घेण्यात आल्यामुळं सर्वच स्तरांतून या निर्णयाचं स्वागत होत आहे.
सत्कार सोहळ्याच्या वेळी गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. वारकऱ्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणारा पहिला मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत, असं ते यावेळी म्हणाले.
काळे दाम्पत्याला विठ्ठलाची मूर्ती आणि वृक्ष रोप देऊन मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांची पत्नी लता शिंदे आणि मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याचा पंढरपूर मंदिर समितीकडून सत्कार करण्यात आला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, अब्दुल सत्तार यांच्या मंदिर समितीकडून सत्कार करण्यात आला.