वाकड येथील सोसायटीच्या आवारातील वाहने जाळली
गुरुवारी (दि. 29) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास व्हिजन एस सोसायटी, भूमकर चौक वाकड येथे सोसायटीच्या आतील बाजूला पार्क केलेली वाहने अज्ञाताने पेटवून दिली. यामध्ये सात वाहनांचे नुकसान झाले आहे.
सोसायटीच्या आतील वाहनांच्या जळण्याचा आवाज आल्यानंतर सोसायटी मधील नागरिक जागे झाले. त्यानंतर पाणी मारून आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत या आगीत एक रिक्षा आणि चार दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. एक कार आणि दुचाकीचे देखील या आगीत मोठे नुकसान झाले आहे.
सोसायटीच्या गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. ज्या ठिकाणी घटना घडली तो परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येत नाही. घटना घडली त्यावेळी सोसायटीमधील सुरक्षा रक्षक त्यांच्या केबिनमध्ये झोपले होते. त्यामुळे ही आग नेमकी कोणी लावली हे अद्याप समजू शकलेले नाही.याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.