‘पीएमआरडीए’च्या लाभार्थ्यांना वीजजोडणीसाठी भोसरीच्या महावितरण कार्यालयात मदत कक्ष
चिखली- जाधववाडी, सेक्टर 12 येथील प्रकल्पात लाभार्थ्यांना PMRDA कडून परवडणाऱ्या घराचा ताबा देण्यात आला आहे. या लाभार्थ्यांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी महावितरणकडून वेगाने कार्यवाही सुरू आहे.यासाठी भोसरी गाव येथील शाखा कार्यालया मध्ये विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.त्यामुळे वीज जोडणीचे कोणत्याही अनोळखी व्यक्तीने आमिष दाखवून आर्थिक मागणी केल्यास लाभार्थ्यांनी त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.तसेच नवीन वीजजोडणीच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास शाखा अभियंता,भोसरी गाव व अतिरिक्त कार्यकारी अभियंता,
भोसरी उपविभाग यांच्याशी थेट संपर्क साधावा भोसरी गाव येथील शाखा कार्यालयात नवीन वीजजोडणीच्या कामासाठी ग्राहक सुविधा केंद्राचे आणखी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.ज्या लाभार्थ्यांना वीजजोडणी साठी ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल, त्यांनी केवळ आवश्यक कागदपत्रांसह भोसरी गाव शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. कागदपत्रांची तपासणी करून त्याची पूर्तता करून घेणे, कोटेशन देणे व त्याचा भरणा केल्यानंतर क्रमवारीनुसार नवीन मीटर उपलब्ध करून वीजजोडणी कार्यान्वित करणे आदी कार्यवाही करण्यात येत आहे.
महावितरणकडे मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध असून पीएमआरडीच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सर्वच सुमारे 3 हजार 100 घरांना नवीन वीजमीटर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत नवीन वीजजोडणीचे 1 हजार 919 अर्ज प्राप्त झाले असून 1 हजार 509 ग्राहकांना कोटेशन देण्यात आले आहे.यात कोटेशनचा भरणा केलेल्या 1 हजार 367 ग्राहकांकडे नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्यांना ऑनलाइन अर्ज भरता येत नाही त्या लाभार्थ्यांनी घराचे अलॉटमेंट लेटर,म्हणजेच ताबापत्रावरील व्यक्तीचे आधारकार्ड या आवश्यक कागदपत्रांसह भोसरी गाव शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.