समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, बस जळाल्याने 25 प्रवाशांचा मृत्यू तर 8 जखमी
विदर्भ ट्रॅव्हलच्या बसचा समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे बस मधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथील पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर झाला.
विदर्भ ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एमएच 29 बी ई 1819 ही 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जात होती. 1 जुलै च्या रात्री 1.22 मिनिटाने विदर्भ ट्रॅव्हल्सच्या धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून उलटी झाली. त्यानंतर गाडीने काही मिनिटामध्ये पेट घेतला व स्फोट होऊन संपूर्ण गाडी पुर्णपणे जुळून खाक झाली. या ट्रॅव्हल्समधील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. बुलढाण्याचे डेप्युटी एसपी बाबुराव महामुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधून 25 जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एकूण 33 प्रवासी या ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होते. त्यातील 8 लोक जखमी झाले आहेत. जखमींना बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.फायर ब्रिगेडच्या मदतीने बसला लागलेली आग विझवण्यात आली व बस मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले.