सर्व मंदिरे पर्यावरण पूरक आणि प्रदूषण मुक्तीची आदर्श केंद्रे होणार*-पिंपरी चिंचवड पर्यावरण संरक्षण गतीविधीचा स्तुत्य उपक्रम
पर्यावरण संरक्षण गतीविधी, पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या माध्यमातून गेल्या २ वर्षांमध्ये विविध ठिकाणी प्रवास करत असलेले अखिल भारतीय संयोजक श्री गोपालजी आर्य ,प्रांत संयोजक विद्यावाचस्पती श्री राहुलजी मुंगीकर ,प्रांत सहसंयोजक श्री विवेक देशपांडे आणि विभाग संयोजक श्री रमेश करपे यांच्या प्रवासादरम्यान श्री मोरया देवस्थान चिंचवड गाव चे मुख्य विश्वस्त श्री मंदार महाराज देव यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.धार्मिक कार्यविभाग अंतर्गत , सर्व मंदिरे ही पर्यावरण पूरक आणि प्रदूषण मुक्त जीवन शैलीचा प्रचार करणारी आदर्श केंद्रे ठरावीत . याकरिता मंदिरातील निर्माल्यापासून उदबत्ती,
धूप,अत्तर इत्यादी वस्तू तयार व्हाव्यात अशी चर्चाही यावेळी झाली होती.या निमित्ताने निर्माल्याची समस्या मार्गी लागून ,काही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल आणि भाविकांना श्रींच्या मूर्तीला वाहिलेल्या ,पवित्र फुलांपासून विविध वस्तू , स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतील अशी कल्पना होती.या संकल्पनेला यश येऊन अशा स्वरूपाच्या पथदर्शी प्रकल्पाचा श्री गणेशा श्री मोरया देवस्थानने पिंपरी चिंचवड शहरात करण्याचा निर्णय घेतला आहे.हा अनुकरणीय प्रयोग भविष्यात ,पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मोठ्या मंदिरांमध्ये होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असूनआगामी वर्षांत समाजामध्ये पर्यावरण संबंधित सकारात्मक परिवर्तन हा विषय मोठ्या गतीने काम करेल असे स्पष्ट केले.त्यामुळे परिवर्तनाचे उदाहरण म्हणून ओळखला जाणारा हा अनावरण सोहळा बघण्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे नम्र आवाहन पिंपरी चिंचवड शहराच्या पर्यावरण संरक्षण गतीविधी जिल्हा मंडळाने केले आहे.