महाराष्ट्र:पुढील तीन दिवस कोकण आणि गोव्याला ‘ऑरेंज अलर्ट’-हवामान खात्याचा अंदाज
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून व्यापला असला तरी जून महिन्यातील सरासरीच्या फक्त 10 टक्के पाऊस झाला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर दोन दिवसांत कमी होईल. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पावसाला पोषक स्थिती तयार होईल. साधारण 7 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.
महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे पुढील तीन दिवस कोकण आणि गोव्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात ही मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडय़ात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुण्यात 1 जून पासून 83.9 मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधीक नोंद ही पाषाण परिसरात 104.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण परिसरात काल शुक्रवार पासून पावसाने जोर धरल्याने येत्या काही दिवसात शहराची पाणी कपात बंद होईल असे प्रशासना कडून सांगितले आहे. आज (दि.1 ते 7 जुलै पर्यंत शहर व आसपासच्या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.