शासनाने आळंदी परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावा -सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन
आळंदी तीर्थक्षेत्र परिसरात वनखात्याची अंदाजे एक हजार एकर वनक्षेत्र जागा आहे. वनक्षेत्रामधील ऐतिहासिक ठेवा जपणूक, वन्यजीव पशुपक्षी संरक्षण, पर्यटन स्थळ विकसित करण्याबाबत भाजप किसान मोर्चाचे सदस्य संजय घुंडरे पाटील यांनी सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना एक निवेदन दिले आहे .या निवेदनात वरील बाबींचा समावेश आहे.निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आळंदी देवाची ह्या सर्व परिसरात वन पर्यटन आणि ऑक्सिजन पार्क विकसित केल्यास येथे येणाऱ्या सामान्य नागरिक, भाविक, वारकरी यांना त्याचा आनंद घेता येईल.देहू आळंदी परिसराच्या वनक्षेत्रात पांडवकालीन शिव मंदिर तसेच आळंदी येथे प्राचीन शिवपीठ आहे. ही सर्व शिवलिंगे याच वनविभागात स्थापित असल्याने ही शिवलिंगे पाहण्यास पर्यटक व शिवभक्त वर्षभर भेट देतात.
रोटाईचे ऐतिहासिक तळे ही याच परिसरात आहे. या तळ्याचे पाणी कधी आटत नसल्याने निसर्गरम्य या क्षेत्रात सुमारे 400 ते 500 मोर व इतर अनेक वन्यजीव वास्तव्य करतात. त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मोरांना व अन्य पशुपक्षांना संरक्षण दिल्यास पर्यटन वाढण्याची खात्री आहे. त्यामुळे शासनाने हा परिसर राखीव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावा.या भागात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शुद्ध पाण्याचे कुंड आहे. त्याचे जतन केल्यास वन्यजीव आणि पर्यटक यांना त्याचा फायदा होईल.
चाकण हा औद्योगिक भाग असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे.या भागातील औद्योगिक कंपन्या, नागरिक या परिसरात कचरा टाकून हा परिसर ऱ्हास करत आहेत.वनक्षेत्राचा विकास केल्यास औद्योगिकीकरणामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा समतोल साधता जाईल.
अनेक औद्योगिक कंपन्याच्याकडून आर्थिक मदत घेऊन हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावा. तसेच शासनाने देखील या कामी मदत मिळवून द्यावी. अशी या निवेदनात मागणी करण्यात आली आहे.याप्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, श्रीकांत घुंडरे पाटील, जनार्दन पितळे, राहुल गोडसे उपस्थित होते.