महाराष्ट्र:सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणार- राष्ट्रवादी कठोर पाऊल.
काल महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपाचा परिणाम आज दिसून येत आहे. उपमुख्यमंत्रिपदाची अजित पवार यांनी शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय अजित पवार गटाने घेतला.दुपारी अडीच वाजता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी यांच्याबरोबर इतर आठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याने पक्षातील मतभेद आता उघड झाले असून रात्री उशिरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेऊन केलेली ही कृती आहे. याबाबत एका सदस्याने तक्रार केली असून ती राष्ट्रवादीच्या शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली. आम्ही सर्व माहिती घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे.
सत्तेत सहभागी झालेल्या नऊ आमदारांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंबंधी आम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मेल केला असून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं,’ असं जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील अशा राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे