महानगरपालिका:अखेर पालिकेतील रखडलेल्या 235 कर्मचाऱ्यांच्या झाल्या अंतर्गत बदल्या
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या अंतर्गत बदल्या अखेर झाल्या आहेत. प्रशासनाने 15 विभागातील अधिकारी, कर्मचारी अशा 235 जणांच्या बदल्या केल्या आहेत.
महापालिकेच्या बदली धोरणानुसार एकाच विभागात 3 किंवा 6 वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या विभागात महिन्यात बदल्या केल्या जातात. अनेक अधिकारी, कर्मचारी बदलीसाठी पात्र असताना त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. त्यामुळे पालिकेतील लाचखोरी, भ्रष्टाचाराला बळ मिळत होते. सातत्याने लाचखोरीच्या घटना घडत होत्या. शासनाने बदल्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत दिली असल्याचे प्रशासना कडून सांगितले जात होते.अखेरच्या दिवशी शनिवारी रात्री उशिरा बदल्या केल्या आहेत. त्यात भांडारपाल 5, सहायक भांडारपाल 5, मुख्य लिपिक 28, लिपिक 79, मजूर 30, शिपाई 17, कार्यकारी अभियंता (विद्युत) 1, उपअभियंता (विद्युत) 2, उपअभियंता (स्थापत्य) 12, कनिष्ठ अभियंता (विद्युत) 3, कॉप्युटर ऑपरेटर 11, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 2, लघुलेखक 2 आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 30 अशा 235 कर्मचा-यांच्या बदल्या केल्या.
जुलै महिन्याचे वेतन नव्या विभागातून काढले जाणार असल्याने बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी बदली झालेल्या विभागात तत्काळ रूजू व्हावे. व रूजू अहवाल सामान्य प्रशासन विभागास पाठवावे असे सामान्य प्रशासना विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी स्पष्ट केले आहे.