किराणा दुकानाचे शटर उचकटून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस.. पिंपळे सौदागर घटना
पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि.2) पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानातून तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
अचलरामजी गोमारामजी चौधरी (वय 42, रा.पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपळे सौदागर येथे न्यु बालाजी ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानाचे चोरट्यांनी शटर उचकटून दुकानातील रोख 1 लाख 53 हजार व कामगाराचा दोन हजाराचा मोबाईल असा एकूण 1 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत दुचाकीवरून पसार झाले.
सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.